नगरमध्ये शाळकरी मुलीला त्रास देणारा पुण्यात लपून करत होता क्लिनरची नोकरी, पोलिसांनी केली अटक

nagar-crime

शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी पुण्यातून अटक केली. मुलीची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपीच्या शोधासाठी पाठवलेल्या पथकाने दोन दिवस शोध घेऊन आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. अक्षय बंडु कुऱ्हाडे (वय 23 वर्ष) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी अक्षय कुऱ्हाडे हा बऱ्याच दिवसांपासून पाठलाग करत होता. त्यानंतर दि 19 ऑगस्ट रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगसह पोक्सो कलमान्तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, चाकण, रांजणगाव, तळेगाव या परिसरात ठिकाण बदलून राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यादव यांनी दोन स्वतंत्र पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती. आरोपी हा वाहनावर क्लीनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच लोणीकंद जिल्हा पुणे या ठिकाणावरून कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शितल मुगडे करत आहेत.

पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश थोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, संदिप थोरात, अमोल गाढे, याकुब सय्यद, सोमनाथ राऊत, मोबाईल सेलचे नितीन शिंदे, रिंकी माढेकर, ज्योती काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.