देवगडमधील न्हावनकोंड धबधब्यावरील प्रकाराने पोलीस अलर्ट; गोंधळ घालणाऱ्या युवकांना दिली समज

देवगड तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या तळवडे न्हावनकोंड धबधब्यावर गेल्या शनिवारी युवकांच्या दोन गटात झालेल्या हाणीमारीनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. देवगड पोलीस निरिक्षक अरूण देवकर यांनी सहकाऱ्यांसमवेत शनिवारी या धबधब्याला भेट दिली. या ठिकाणी कोणीही अनुचित प्रकार केल्यास आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी समज त्यांनी पर्यटनासाठी आलेल्या युवावर्गाला दिली.

गेल्या शनिवारी वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात प्रसिध्द असलेल्या न्हावनकोंड धबधब्यावर युवकांच्या दोन गटात राडा झाला होता. यावेळी हे युवक मद्यधुंद स्थितीत होते. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नव्हते. दोन्ही गटात राडा झाला या घटनेनंतर तेथिल ग्रामपंचायत प्रशासनही अलर्ट झाले. मासिक सभेत धबधब्याचा विषय गाजला होता. त्यानंतर त्या ठिकाणी दोन कर्मचारी ठेवण्याचा निर्णयही झाला. गेल्यावर्षीही मद्यधुंद तरूणांच्या दोन गटातही राडा झाला होता. यामुळे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत आहे.

पोलिसांनी शनिवारी धबधब्याला भेट देत गोंधळ घालणाऱ्या युवकांना कडक शब्दात समज दिली आहे. यापुढे असे प्रकार घडल्याच कडक कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सुचना पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांनी दिल्या आहेत.