सीमेवरील एक इंच जागेचीही तडजोड केली जाणार नाही,  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेजारील राष्ट्रांना इशारा

हिंदुस्थान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये सामंजस्य करार झाला असून सीमेवरील सैन्य मागे घेण्याबाबत आणि चौक्या हटवण्याबाबत सहमती झाली आहे. याबाबतची प्रक्रियाही पूर्ण झाली असून आज दोन्ही सैन्याने एकमेकांना मिठाई भरवून दिवाळीही साजरी केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

हिंदुस्थानच्या सीमेवरील एक इंच जमिनीसाठीही कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकत नाही. या देशातील लोकांना हिंदुस्थानी लष्कराच्या ताकदीवर प्रचंड विश्वास आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना इशारा दिला. पंतप्रधानांनी गुजरातच्या कच्छ येथे जाऊन लष्कराच्या जवानांना मिठाई भरवून दिवाळी साजरी केली. त्यानंतर त्यांनी जवानांना संबोधित केले.

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात जाऊन पंतप्रधानांनी लष्कराच्या जवानांची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. हिंदुस्थानच्या लष्कराच्या सतर्कतेमुळेच देशाच्या शत्रूंचे भयंकर डाव उधळून लावले जातात. या देशातील नागरिक केवळ तुमच्यामुळेच सुरक्षित आहेत. जेव्हा जग तुमच्याकडे पाहते तेव्हा तुमच्यात त्यांना देशाची ताकद दिसते, मजबूत राष्ट्र दिसते आणि जेव्हा शत्रू तुमच्याकडे पाहतो तेव्हा त्यांचे सगळे मनसुबे तडीस जाण्याआधीच धुळीस मिळालेले असतात, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांना संबोधित केले.

देशाच्या विकासाचे स्वप्न लष्करामुळेच सुरक्षित

देशाच्या विकासाच्या दिशेने आपण वेगाने आगेकुच करत असून विकासाचे हे स्वप्न केवळ तुमच्यामुळेच सुरक्षित आहे. आम्ही देशाच्या संरक्षणासाठी शत्रूच्या बोलण्यावर नाही तर देशाच्या सैन्याच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. देशातील लोकांना विश्वास आहे की हा देश केवळ तुमच्यामुळेच सुरक्षित आहे. सीमावर्ती गावांचा विकास आणि येथील पायाभूत सुविधा वाढवणे हेच देशाचे लक्ष्य असून त्यात लष्कराचा सर्वात मोठा वाटा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.