मोदींची भाषा बदलली, देशात सेक्युलर सिव्हिल कोड हवा!

लोकसभा निवडणुकीत जनतेने झटका देत भाजपचा फुगलेला आकडा बहुमताच्या खाली आणल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा आणि देहबोली बदलली आहे. देशात आता धर्मनिरपेक्ष नागरी कायदा (सेक्युलर सिव्हिल कोड) आणणे ही काळाची गरज असल्याचे मोदी म्हणाले. त्याचवेळी देशात गेल्या 75 वर्षांपासून असलेल्या नागरी कायदा संहितेचा उल्लेख कम्युनल सिव्हिल कोड असा करत मोदींनी त्याला जातीचे लेबल लावले.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून 103 मिनिटांचे प्रदीर्घ भाषण दिले. यावेळी समान नागरी कायद्यावर ते बोलले. सर्वेच्च न्यायालयाने अनेकवेळा समान नागरी कायद्याची गरज अधोरेखित केली आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. सध्याची नागरी संहिता ही एक प्रकारे जातीय नागरी संहिता आहे, असे समाजातील मोठय़ा वर्गाला वाटते आणि त्यात तथ्यही आहे. ही नागरी संहिता भेदभावाला प्रोत्साहन देते. ती देशाला धार्मिक भेदांनुसार विभाजित करते आणि असमानतेला प्रोत्साहन देते. यामुळेच देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता ही काळाची गरज आहे, असे विधान मोदींनी केले.

वन नेशन वन इलेक्शनसाठी आवाहन

वारंवार होणाऱया निवडणुका देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात. शिवाय, जाहीर होणारी प्रत्येक योजना ही दर काही महिन्यांनी होणाऱया या ना त्या निवडणुकीमुळेच आली असा समज होतो. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे मोदी म्हणाले.

बांगलादेशला आवाहन

आम्ही शांततेसाठी कटीबद्ध आहोत असे सांगत त्यांनी शेजारील बांगलादेशातील अशांततेचा उल्लेख केला. तेथील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल हिदुस्थानला चिंता वाटत असून, तेथील परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. आपण नेहमीच बांगलादेशचे भले चिंतिले आहे, असे म्हणत त्यांनी सुख आणि समृद्धीसाठी बांगलादेशला शुभेच्छा दिल्या.

म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध माझा प्रामाणिक लढा!

भाजप ही भ्रष्टाचाऱयांना क्लीन करणारी वॉशिंग मशीन बनली असताना मोदींनी भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिक लढा देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे विधान केले. सामान्य जनता भ्रष्टाचाराचे चटके सोसत असून सगळ्यांनीच भ्रष्टाचाऱयांपासून दूर राहिले पाहिजे व या लढय़ात सामील झाले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांची दिली कबुली

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व निभावले आहे, परंतु त्यांच्यावरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. लोकांच्या रागाची मला जाणीव आहे. अशा प्रकरणांमध्ये जलद न्याय आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी सरकारच्या अपयशाचीच कबुली दिली. कोलकातातील सामूहिक बलात्काराचा उल्लेख करत असे राक्षसी कृत्य करणाऱयास फासावर लटकवले पाहिजे तरच अशा गुन्हेगारांना जरब बसेल, असे मोदी म्हणाले.

मोदी पंतप्रधान वाटतच नाहीत, भाजपाचे छोटे-मोठे नेते वाटतात-काँग्रेस

मोदी पंतप्रधान वाटतच नाहीत तर ते भाजपाचे छोटे-मोठे नेते वाटतात. त्यांनी आपल्या पदाची मर्यादा राखली पाहिजे. एकाबाजूला ते संविधानाची शपथ घेतात आणि दुसरीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सेक्युलर सिव्हिल कोडला जातीय म्हणतात, हे चुकीचे आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल बोलताना ते सांगतात आधीच्या सरकारच्या काळात दहशतवादी हल्ले होत होते. मी मानतो की संसदेवर हल्ला झाला होता, पंदहार येथे विमान अपहरण झाले होते. मात्र, आजच्या दिवशी अटलजींचा अपमान करायला नको होता, असे काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले. आता ते भ्रष्टाचाराबद्दल बोलणार नाही. आधी ते याबद्दल बोलताना प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, अजित पवार, सुवेंदु अधिकारी आणि हिमंता बिस्वा सरमा यांची नावे घ्यायचे. पण, आज एकाचे तरी नाव घेतले का? असा सवालही खेडा यांनी केला. दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पंतप्रधानांनी काय पावले उचलली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.