महात्मा गांधी आयुष्यभर पंचावर वावरले, नरेंद्र मोदी हे दररोज सतरंजीवर झोपणार आहेत का?

युवा संसदेत संजय राऊत यांची रोखठोक मुलाखत

श्रीरामाचा पहिला राज्याभिषेक पंचवटीत झाला…

‘‘अयोध्येतील श्रीराम मंदिर हे भाजपने नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंदिर समितीने उभारले आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपवासाचे नाटक करून देशाची दिशाभूल करत आहेत. देशातील लोकांना जेक्हा अंगावर वस्त्र नाही म्हणून महात्मा गांधी पंचा नेसून आयुष्यभर वावरले. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे दररोज सतरंजीवर झोपणार आहेत का?’’ असा सवाल शिवसेना नेते – खासदार संजय राऊत यांनी केला.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या वतीने आयोजित सातव्या युवा संसदमध्ये संजय राऊत यांची विशेष मुलाखत झाली. शिवसेना उपनेते सुषमा अंधारे आणि ‘लोकमत’चे संपादक संजय आकटे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी ‘राजकारण, समाजकारण आणि शिवसेनेबद्दलच्या प्रश्नांकर सडेतोड उत्तरे देत चौफेर टोलेबाजी केली.  या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधकर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर उपस्थित होते.

श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणातून शिवसेनेला टाळण्यात आल्याबद्दल विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ‘‘अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान मोठे आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतून रसद पाठवली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राम मंदिर प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून लखनौच्या कोर्टात जावं लागलं होतं. तरीसुद्धा भाजपची पोरं म्हणतात, तुमचे योगदान काय? आम्ही काय फलटावर जाऊन परतलो नव्हतो. तो एका पक्षाचा सोहळा होता. त्यासाठी आम्ही का जावं? आम्ही अयोध्याला जाऊ; परंतु ज्या कार्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी योगदान दिलं, ते भाजपने नाकारलं. परंतु योगायोग बघा 22 जानेवारीला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनाच्या पूर्वार्ध्येला हा सोहळा झाला.’’

भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही

राऊतसाहेब तुम्ही एकढं बोलता, तुम्हाला भीती वाटत नाही का? या थेट प्रश्नाकर संजय राऊत म्हणाले, ‘‘भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही. शिवसेनाप्रमुखांबरोबर आयुष्य काढले, त्याला भीती कशी वाटेल. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी मला ‘सामना’चं कार्यकारी संपादक केलं. तोपर्यंत मला अग्रलेख, बातमी काही माहीत नव्हतं. तेव्हादेखील मला भीती वाटली नाही. काही जण मला शरद पवार, कॉम्रेड डांगेंचा माणूस आहे म्हणून सांगतात. परंतु मी शिवसेनेचा आहे. बाळासाहेबांचा माणूस आहे.’’

‘‘अयोध्येनंतर पवित्र भूमी म्हणून पंचवटीची ओळख आहे. खरं रामायण पंचवटीमध्ये घडलं आहे. रामाचा वनवास संपल्यावर अयोध्येत घेऊन जाण्यासाठी भरत पंचवटीत आला. त्या वेळी रामाचा पहिला राज्याभिषेक पंचवटीत झाला आहे. नंतर अयोध्येत झाला. म्हणून आम्ही काळाराम मंदिरात सोहळा साजरा केला.’’