लोकसभेतील जबर फटक्यानंतर सरकार ठिकाणावर; PM किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी

लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावलेला सत्ताधारी भाजप ताळ्यावर आल्याचे दिसत आहे. एमएसपी कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन करत गेल्या टर्ममध्ये मोदी सरकारला धारेवर धरले होते. शेतकऱ्यांचे हे आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला. यामुळे निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर भानावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपधविधीनंतर पहिली सही शेतकऱ्यांसाठी करावी लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. नव्या सरकारमधील शेतकऱ्यासांठीचा हा पहिला हप्ता आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये जमा होणार आहेत.

पीएम किसान योजना म्हणजेच शेतकरी सन्मान निधी ही योजना 2019 पासून सुरू झाली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिला जाणारा हा 17 वा हप्ता असेल. या योजनेनुसार दरवर्षी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. वर्षाला एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना केंद्र सरकारद्वारे करण्यात येते.