पंतप्रधान वायनाडला गेले चांगलचं आहे, त्यांनी मणिपूरलाही जावं; काँग्रेसचा जोरदार टोला

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसाने झालेल्या भूस्खलनात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात 30 जुलैला ही घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वायनाड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भूस्खलन झालेल्या परिसराची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनही होते. यानंतर घटनास्थळी जाऊन पंतप्रधान मोदी यांनी माहिती घेतली. घटनेच्या 11 दिवसांनी पंतप्रधान मोदी हे वायनाड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसने पंतप्रधानांच्या वायनाड दौऱ्याचं स्वागत केलं आहे. पण मणिपूरमधील हिंसाचारावरून टोलाही लगावला आहे.

वायनाडमध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यात 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. वायनाडमधील भूस्खलनाची दुर्घटना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसने केली होती. आणि आज पंतप्रधान वायनाडला गेलेत, हे चांगलं आहे. त्यांनी मणिपूरला भेट दिली तर बरं होईल. दीड वर्षापासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे त्यांनी मणिपूरलाही जावं, असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लगावला.

पंतप्रधानांनी सर्वच ठिकाणी दौरा करावा. त्यांनी युक्रेनला जावं, रशियाला जावं. वायनाडचा दौरा गरजेचाच आहे. त्यासोबत मणिपूरलाही भेट देणं गरजेचं असल्याचं जयराम रमेश म्हणाले. आज दार्जिलिंगचे एक शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी आलं होतं. 10 वर्षांत पंतप्रधानांनी एकदाही दौरा केला नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. पंतप्रधानांनी दौरा करावा, असं सगळ्यांनाच वाटतं. नॉन बायलॉजिकल असलेल्या पंतप्रधानांना सर्वांना बघायचंय, ऐकायचं, असा चिमटाही जयराम रमेश यांनी काढला.