गोड बोलून काटा काढण्याचा कट! मनोज जरांगे यांचा सरकारवर आरोप; तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार

एका बाजूला माझे बेमुदत उपोषण सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडून पुन्हा चर्चेचा खेळ सुरू झाला आहे. गोड बोलून माझा काटा काढण्याचा हा कट असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची प्रकृती अधिक खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी चौथ्यांदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. माझ्या आंदोलनाची सरकार दरबारी दखल घेतली जात नसून मला खेळवण्यात येत आहे, असे जरांगे म्हणाले.

सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही, तर मराठे सरकारला चांगलाच हिसका दाखवतील, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगे-पाटील यांनी समाचार घेतला.

उपचारासाठी प्रशासनाची विनंती

मनोज जरांगे यांची आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून साखरेचे रक्तातील प्रमाणही घटले आहे. त्यांना प्रचंड ग्लानी आली असून आवाजही खोल गेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. परंतु  जरांगे यांनी त्यास नकार दिला. सरकार मागण्यांवर निर्णय घेत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही, असेही ते म्हणाले.