रेसकोर्सची जागा हडपणारच का! मिंधे, बीजेपी सरकार उत्तर का देत नाही; आदित्य ठाकरे यांचा सवाल

घटनाबाह्य मिंधे भाजप सरकार बिल्डरच्या घशात घालून हडपणार का, याबाबत वारंवार आवाज उठवूनही उत्तर देत नाही. शिवाय रेसकोर्सच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोटय़ा झोपडय़ा/घरांतील कुटुंबांचे पुनर्वसन कसे होणार, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे माझ्या माहितीनुसार, हे मिंधे सरकार आपल्या लाडक्या बिल्डरकरवी रेसकोर्सवर ‘झोपु’ योजना राबवेल, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला.

रेसकोर्सची जागा मिंधे सरकार कंत्राटदार मित्राच्या घशात घालण्यासाठी कारस्थान करीत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी याआधीच केला आहे. याबाबत आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल आणि सरकार कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर नमूद केले. याशिवाय खासगी तबेल्यांच्या पुनर्बांधणीसाठी मुंबईकरांचे 100 कोटी का घालवायचे? या घोडय़ांचे मालक आणि ‘आरडब्ल्यूआय टीसी’ खर्च करायला समर्थ असताना हा खर्च पालिका का करणार आहे, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सर्वात हास्यास्पद म्हणजे हे भाजप पुरस्कृत सरकार आम्ही कोस्टल रोड प्रकल्पासाठी राखून ठेवलेला 96 हेक्टरचा हरित पट्टाही याला जोडून असल्याचे दाखवत आहे. नशीब त्यांनी ‘अरबी  समुद्र’ त्यांच्या ‘थीम पार्क’चा भाग म्हणून दाखवला नाही, असा टोला त्यांनी लगावला. महालक्ष्मी रेसकोर्सनंतर बेकायदा मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र वेलिंग्टन क्लब, सीसीआय आणि आणखी मोकळय़ा जागांना  लक्ष्य करेल. मात्र आमचे सरकार लवकरच सत्तेत येईल आणि ही लूट थांबवेल, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रश्नांचीही उत्तरे द्या

शिवसेनेच्या माध्यमातून आधीच कोस्टल रोड येथे भूमिगत कार पार्किंगची व्यवस्था केली असताना आता रेसकोर्स येथे भूमिगत कार पार्किंग उभारण्याची गरजच काय?

हे केवळ सीएम (कॉण्ट्रक्टर मंत्र्यांच्या) ठेकेदार मित्राला काम देण्यासाठी केले जात आहे. परिणामी चार वर्षे खोदकाम सुरू राहील. रेसकोर्स बंद राहील आणि मुंबईचे वायू प्रदूषण वाढत राहील. याला जबाबदार कोण?