फिलिपिन्सच्या कानलोनमध्ये पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक, 87 हजार लोकांचे सुखरुप स्थलांतर

फिलिपिन्सच्या कानलोन ज्वालामुखीमध्ये सोमवारी मोठा उद्रेक झाला. या उद्रेकामुळे बाहेर पडणारी राख आकाशात हजारो मीटर पसरली आणि अत्यंत उष्ण लावा प्रवाह ढिगाऱ्यासह पश्चिमेकडील उतारावरून खाली वाहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मॉलॉजीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे सुमारे 87 हजार लोकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.

मध्य निग्रोस बेटावरील कानलोन ज्वालामुखीच्या नुकत्याच झालेल्या उद्रेकात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आणखी मजबूत उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नेग्रोस बेटावर स्थित कानलोन ज्वालामुखी समुद्रसपाटीपासून सुमारे 8,000 फूट उंच आहे. फिलीपिन्समधील 24 सक्रिय ज्वालामुखींपैकी हा एक आहे. या ज्वालामुखीचा यापूर्वी अनेकदा उद्रेक झाला असून, त्याच्या जवळ वसलेल्या गावांसाठी तो नेहमीच धोक्याचा इशारा ठरला आहे. फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मॉलॉजीने सतर्कतेची पातळी वाढवली आहे. या स्फोटाला सुरुवात झाली असून त्याचा आणखी मोठा उद्रेक होण्याचा इशारा संस्थेने दिला आहे. कानलोन ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक या वर्षी जूनमध्ये झाला होता.

फिलिपिन्सचे मुख्य ज्वालामुखीशास्त्रज्ञ तेरेसिटो बाकोलकोल आणि इतर अधिकाऱ्यांनी फोनद्वारे सांगितले की, , ज्वालामुखीची राख प्राचीन प्रांतासह ज्वालामुखीच्या पश्चिमेला 200 किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेल्या सागरी भागात पडली आहे. राखेच्या ढगामुळे दृश्यमानता कमी झाली आणि आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही पोस्ट केले आहेत. फिलिपाइन्सच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, कानलॉन ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सोमवार आणि मंगळवारी सिंगापूरला जाणारी किमान सहा देशांतर्गत उड्डाणे आणि एक उड्डाण रद्द करण्यात आले. तर 2 लोकल उड्डाणे वळवण्यात आली.