पीएफ काढण्यासाठी आता एटीएम कार्ड मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची रक्कम काढणे आता अधिक सोयीस्कर होणार आहे. कारण कर्मचाऱयांना नवीन वर्षांत पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढता येणार आहे. या योजनेंतर्गत एटीएम कार्डप्रमाणे ईपीएफओ सदस्यांना पैसे काढण्यासाठी एक कार्ड दिले जाईल. कर्मचाऱ्यांना कार्ड मिळण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील. सध्या कर्मचाऱयांना त्यांचे पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतर काही दिवस वाट पाहावी लागते, पण नवीन प्रणालीनुसार पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. ईपीएफओ त्यांच्या सात कोटींहून अधिक ग्राहकांना बँकिंग प्रणालीच्या बरोबरीने सेवा प्रदान करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाला एक मोठा दिलासा मिळेल.

7 लाखांपर्यंत रक्कम काढता येणार

नवीन प्रणालीद्वारे लाभार्थी एटीएमद्वारे त्यांच्या हक्काची रक्कम काढू शकतील. तसेच मृत सदस्यांच्या वारसांना ईपीएफओद्वारे चालवल्या जाणाऱया एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) या योजनेंतर्गत कमाल सात लाख रुपये काढता येतील. याशिवाय मृत ईपीएफओ सदस्याचा वारसदेखील पैसे काढण्यासाठी एटीएम वापरण्यास सक्षम असेल. मात्र ईपीएफओने ही सुविधा नेमकी कधीपासून सुरू करणार आहे, हे अद्याप स्पष्ट केले नाही.