तालवाद्याचा जादूगर हरपला; दीपक बोरकर यांचे निधन

ज्येष्ठ तालवादक दीपक बोरकर (72) यांचे  मंगळवारी अल्पशा आजाराने  निधन झाले. गेली 50 वर्षे तालवादन करून दीपक बोरकर यांनी  संगीत क्षेत्रात आपले हक्काचे स्थान मिळवले होते. अनेक नामांकित संगीतकारांसोबत काम करून असंख्य अजरामर गीतांना त्यांनी जन्म दिला. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

दीपक बोरकर न्यूमोनियाने आजारी होते. त्यांच्यावर कांदिवली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. दरम्यान, मालाड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बांबूतरंग आणि मादलची जादू

बांबूतरंग तालवाद्य ही दीपक बोरकर यांची खासियत होती. अनेक गाण्यात त्यांनी  बांबू तरंगाचा प्रयोग केला.  ‘ए जो चिल्मन है …’ हे त्यापैकी एक अत्यंत लोकप्रिय गीत. याव्यतिरिक्त मादल वाद्य, डुग्गी, रेशो रेशो वादनात त्यांचा हातखंडा होता. ‘पर्वत के इस पार… पर्वत के उस पार…’ या गाण्यातील त्यांच्या घुंगरू तरंगानेही रसिकांचे मन जिंकले.

दिग्गज संगीतकारांना साथसंगत    

बोरकर यांनी जुन्या-नव्या पिढीतील संगीतकारांसोबत काम केले. पंचमदा, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद-मिलिंद, खय्याम, जतीन-ललित, यशवंत देव, प्रभाकर पंडित, सुधीर फडके, गजानन वाटवे, स्नेहल भाटकर, अशोक पत्की, हृदयनाथ मंगेशकर अशा अनेकांना साथसंगत केली. फाल्गुनी पाठक, अशोक हांडे यांच्यासोबत अनेक कार्यक्रम केले. संगीत संयोजक आप्पा वढावकर यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग असायचा. अर्धशतकाच्या संगीतमय कारकीर्दीत त्यांनी देशविदेशात हजारो कार्यक्रम केले.