पोलिसाच्या डोक्यात पेक्हर ब्लॉक मारला

नाकाबंदीदरम्यान रिक्षाची तपासणी केल्याने संतप्त झालेल्या रिक्षा चालकाने पोलीस हवालदाराच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारल्याची घटना पवई येथे घडली. चिंतामण बेलकर असे जखमी पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

चिंतामण हे पवई पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पवई पोलिसांचे पथक जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोडच्या दक्षिण वाहिनीवर नाकाबंदी करत होते. पोलीस संशयित वाहनांची तपासणी करत होते. तेव्हा पोलिसांनी एका रिक्षा चालकाला थांबवले. रिक्षाची तपासणी करण्यावरून रिक्षा चालकाने चिंतामण यांच्याशी हुज्जत घातली. तसेच त्याने चिंतामण यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर त्याने चिंतामण यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून जखमी केले. घडल्याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले.

सरकारी कामात अडथळा, पेव्हर ब्लॉकने दुखापत केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली. या घटनेने वाहतूक नियंत्रणाचे काम करणाऱया पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.