पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत रुग्णमित्र हेल्प डेस्क; रुग्ण, नातेवाईकांना एकाच ठिकाणी मिळणार सर्व माहिती

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत मुंबईसह मुंबईबाहेरचे रुग्ण येत असतात. अशा वेळी गर्दी आणि माहितीअभावी गांगरून गेलेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना औषधपाणी कुठे मिळेल, उपचार, ओपीडी अशा अनेक प्रश्नांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच तीन सत्रांमध्ये माहिती देणारे रुग्णमित्र हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहे. केईएममध्ये नुकताच हेल्प डेस्क सुरू करण्यात आला असून केईएमपाठोपाठ नायर, कूपरमध्येही हे डेस्क उभारले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात माफक दरात मिळणाऱया दर्जेदार आरोग्य सुविधांमुळे मुंबईसह देशभरातील रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात मोठय़ा विश्वासाने उपचारासाठी येत असतात. पालिकेच्या रुग्णालयात दररोज 50 हजारांहून रुग्णांवर उपचार केले जातात आणि यापैकी काही रुग्णांचा गंभीर आजार लक्षात घेता उपचारासाठी दाखल केले जाते, मात्र रुग्णालयात आल्यानंतर कुठला विभाग कुठे, डॉक्टर कुठे बसतात, रजिस्ट्रार ऑफिस कुठे, औषध कुठे मिळणार, ऑपरेशन थिएटर कुठे, याचा शोध घेण्यात रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळ जातो. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने केईएममध्ये 23 नोव्हेंबरला रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक 1 व 7 या ठिकाणी हेल्प डेस्क सुरू करण्यात आला.

नायर, कूपरमध्येही हेल्पडेस्क
नायर रुग्णालयात नोंदणी कक्ष विभागाजवळ हेल्प डेस्क उभारला असून कूपर रुग्णालयात नोंदणी कक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ हेल्प डेस्क उभारण्याचे काम सुरू आहे. पूर्व उपनगरातील कुर्ला (प) येथील खान बहादूर भाभा रुग्णालय, गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय तर पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालय, सांताक्रुझचे वि. न. देसाई रुग्णालय, कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय या उपनगरातील महत्त्वाच्या 6 रुग्णालयांमध्येदेखील रुग्ण मित्र हेल्प डेस्क उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित मदत करण्यासाठी, वेळप्रसंगी आधार देण्यासाठी नम्र आणि संवाद कौशल्य उत्तम असलेले आणि सॉफ्ट स्किल्स व्यवस्थितरीत्या आत्मसात केलेले कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
कर्मचाऱयांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व असेल त्याचबरोबर संगणक हाताळण्याचेसुद्धा त्यांना संपूर्ण ज्ञान असेल.हेल्प डेस्कवरती दिशादर्शक फलक, संगणक, दूरध्वनी, नोंदणी पुस्तिका आणि सूचना पेटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.