मला पुन्हा हॉस्टेलची आठवण आली…. फ्लाइटमधील बेचव जेवणामुळे संतप्त प्रवाशाची पोस्ट व्हायरल

विमानात प्रवास करत असताना अनेक प्रवाशांना कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. कधी त्यांच्या सहप्रवाशाबाबत तक्रारी असतात तर कधी विमानातील असुविधांबाबत. प्रवाशांच्या या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पसरतात. त्यामुळे या तक्रारी संबंधीत अधिकाऱ्यांपर्यत लगेच पोहोचतात. असेच एक प्रकरण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. य़ात विस्तारा फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार करणारी एक पोस्ट सोशल मी़डियावर शेअर केली आहे.

कृपाल असे या व्यक्तीचे नाव आहे. कृपाल हे यूट्यूबर आहे.ते जेवणासंबंधी अनेक व्हिडीओ बनवतात. ते विस्तारा फ्लाइटमधून प्रवास करत होते. दरम्यान फ्लाईटमधील जेवण त्यांना फारसे आवडले नाही. त्यामुळे फ्लाइटमध्ये मिळालेल्या या बेचव जेवणाबाबत त्यांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली. त्यांनी जेवणाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलेय की, ‘वाह! Air Vistara, आज मी तुमच्या फ्लाइटमधून प्रवास केला. यावेळी तुमच्या जेवणाने माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे जेवण फारच बेचव होते. चिकन तर खूप दिवसांपूर्वीचे असल्याचे वाटत होते आणि चॉकलेट डेझर्ट तर बालवाडीतल्या मुलांनी बनवलेल्यासारखे वाटले. या जेवणामुळे मला आमच्या हॉस्टेलध्ये मिळणाऱ्या शिळ्या व बेचव अन्नाची आठवण झाली. असे म्हणत कृपालने नाराजी व्यक्त केली.

कृपालने केलेल्या पोस्टवर विस्तारा कंपनीने त्यांचे मत मांडले आहे. यावर ते म्हणाले की, “हाय कृपाल, आमचे सर्व खाद्यपदार्थ हे प्रवाशाच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेऊन बनवले जातात. तुमची निराशा पाहून आम्हाला दुःख झाले आहे. तसेच विस्तारा कंपनीने कृपालक़़डे त्याचा फोन नंबर आणि फ्लाइट संबंधीत इतर माहिती देण्याची विनंती केली आहे.