अलार्म वाजला मुंबईत; सुप्यात एटीएम चोर जेरबंद

सुपा-पारनेर रस्त्यावरील शहजापूर चौकातील मळगंगा कॉम्लेक्समधील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन चोरटे करीत असतानाच स्टेट बँकेच्या मुंबई येथील नियंत्रण कक्षात धोक्याचा अलार्म वाजला. नियंत्रण कक्षातून सुपा पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. त्यानंतर सुपा पोलिसांनी तातडीने धाव घेत दोन चोरटय़ांना जेरबंद केले.

या चोरटय़ांकडून एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेली हत्यारे जप्त केली आहे. यावेळी इतर दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. हा प्रकार रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलीस कर्मचारी रमेश शिंदे, भरत इंगळे, राहुल हिंगसे शहजापूर चौकात पोहोचले असता दत्तात्रय विठ्ठल वीरकर व अनंतकुमार नवनाथ गाडे (रा. लोणीकाळभोर, पुणे) एटीम फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, वीरकर व गाडे यांना मदत करणारे इसाक मचकुरी (रा. लोणी काळभोर) आणि त्याचा एक साथीदार लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून पसार झाले.