हिंदुस्थानचा सुवर्ण पराक्रम, प्रवीण कुमारच्या उंच उडीने रचला पदकांचा विक्रम

अॅथलीट प्रवीण कुमारची उंच उडी हिंदुस्थानसाठी विक्रमी ठरली. हिंदुस्थानने आपल्या पॅरालिम्पिक कारकीर्दीतील सर्वोत्तम सुवर्ण कामगिरी रचताना सहावे पदक जिंकले आणि टोकिया पॅरालिम्पिकच्या पाच सुवर्ण पदकांच्या विक्रमाला मागे टाकले. गुरुवारी हिंदुस्थानने टोकिया पॅरालिम्पिकचा 19 पदकांचा विक्रम मोडीत काढताना पदकांचे रौप्य महोत्सव साजरे केले होते. आज सुवर्ण जिंकत सर्वोत्तम पराक्रम रचला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 117 खेळाडूंच्या कामगिरीने हिंदुस्थानची मान झुकली होती, पण 84 पॅरालिम्पिक खेळाडूंनी सरस कामगिरीचे प्रदर्शन घडवत तमाम हिंदुस्थानींची मान उंचावली. 84 खेळाडूंपैकी आतापर्यंत 25 खेळाडूंनी हिंदुस्थानला पदके जिंकून दिली आहेत. ज्यात सहा सुवर्ण पदकांचाही समावेश आहे. धावपटू प्रीती पाल हिने एकटीने दोन कांस्य पदके जिंकली आहेत.