दीप्ती जीवनजीला कांस्य

सोमवारी हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 8 पदकांची लयलूट करत आपल्या पदकांचा आकडा 15 वर नेला होता. मात्र आज सहाव्या दिवशी हिंदुस्थानच्या अवनी लेखरासारख्या दिग्गजांना अपयश आल्यामुळे हिंदुस्थानच्या पदकांच्या संख्येत फार वाढ झाली नाही. फक्त महिलांच्या 400 मीटर शर्यतीच्या टी-20 श्रेणीत दीप्ती जीवनजीने 55.82 सेकंद ही वेळ देत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. तिचे सुवर्णपदक 66 शतांश सेकंदांनी हुकले.

आज हिंदुस्थानचे खेळाडू जोशात होते, पण समोर प्रतिस्पर्धी तगडे असल्यामुळे कुठेच निभाव लागला नाही. 50 मीटर थ्री पोझिशन्स एसएच 1 श्रेणीत अवनीने जोरदार सुरुवात केली, पण तिचे एलिमेशन राऊंडचा दुसरा निशाणा 9.3 गुणांचा लागला आणि ती मागे पडली. तिचा हा निशाणा परफेक्ट टेन लागला असता तरी ती पदकांच्या शर्यतीत कायम राहिली असती. अवनीने 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण जिंकल्यामुळे तिच्याकडून या प्रकारातही पदकाची अपेक्षा होती, पण ती कमी पडली. या निराशेनंतर दिप्तीने 400 मीटर शर्यतीत शेवटच्या 50 मीटर अंतरात युव्रेनच्या युलिया शुलियार आणि चीनच्या इसेल ओंडरला मागे टाकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण तिचे हे प्रयत्न 66 शतांश सेकंदांनी कमी पडले. शुलियारने ही शर्यत 55.16 सेकंदांत पूर्ण केली, तर दीप्तीने 55.82 सेपंद वेळ घेतला.