Vinesh Phogat – विनेश फोगाटच्या अपात्रेतवरून देशभरात संताप, लोकसभेतही गदारोळ; ऑलिम्पिकवर बहिष्कार घालण्याची मागणी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदाकाच्या सामन्याआधी हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. ओव्हरवेट झाल्यामुळे म्हणजे काही ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. यावरून हिंदुस्थानात संतापची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले. लोकसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. क्रीडामंत्री जबाव दो… अशा घोषणा लोकसभेत देण्यात आल्या. आता या प्रकरणी केंद्रीय क्रीडामंत्री दुपारी 3 वाजता निवेदन देणार आहेत, अशी माहिती संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत दिली.

विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. परिस ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. हा विनेशचा नाही तर देशाचा अपमान आहे. विनेश फोगाट इतिहास रचणार होती. पण 100 ग्रॅम ओव्हरवेट दाखवून तिला अपात्र ठरवत मोठा अन्याय करण्यात आला. संपूर्ण देश विनेशसोबत उभा आहे. हिंदुस्थानच्या सरकारने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा. तसेच आपले म्हणणे मान्य न झाल्यास ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींचे ट्विट

विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने देशभरात संताप आणि नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे. ‘तू चॅम्पियन्स पैकी एक चॅम्पियन आहेस. हिंदुस्थानचा अभिमान आहेस. देशातील प्रत्येकासाठी प्रेरणा आहेस. आजचा प्रसंग वेदनादायी आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. तू पुन्हा नव्या उमेदीने उसळी घेशील हा विश्वास आहे’, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे.

भारतीय कुस्ती संघटना अपील करणार

दरम्यान, या प्रकरणी ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्याशी पंतप्रधान मोदींनी फोनवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुस्थानसमोर असलेल्या पर्यायांवर पंतप्रधान मोदींनी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. अपात्रतेविरोधात अपील करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. विनेश फोगाटच्या अपात्रतेला भारताने कडाडून विरोध केला आहे. विनेशच्या अपात्रतेविरोधात भारतीय कुस्ती संघटना अपील करणार आहे.