Paris Olympic 2024 : मीराबाईचं पदक हुकलं; चौथ्या स्थानावर समाधान, अविनाश साबळेकडूनही निराशा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या मीराबाई चानू हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावनी दिली आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात 49 किलो वजनी गटामध्ये खेळताना मीराबाईला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 199 किलो वजन उचलले, तर थायलंडच्या खंबाओ सुलोचना हिने 200 किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले. चीनच्या हू जीहूई हिने 206 किलो, तर रोमानियाच्या मिहेला वेलेन्टिना हिने 205 किलो वजन उचलत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले.

गेल्यावेळी रौप्यपदक जिंकल्याने यंदाही मीराबाईकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. परंतू वेटलिफ्टिंगची लढत अपेक्षेहून अधिक लक्षवेधक झाली. मीराबाईने स्नॅच प्रकाराच 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो (एकूण 199 किलो) वजन उचलले. मात्र थायलंडच्या खेळाडूने तिच्यापेक्षा अधिक वजन उचलत पदक जिंकले.

हिंदुस्थानची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने एक व्हिडीओ जारी करत देशवासियांची माफी मागितली आहे. ‘पदक न जिंकल्याबद्दल मी देशवासियांची माफी मागते. मी देशासाठी पदक जिंकण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला, पण मी हरले. आपण सर्वजण कधी जिंकतो, तर कधी हरतो. पण पुढच्यावेळी मी देशासाठी पदक जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करेन’, असे मीराबाईने म्हटले. तसेच माझं नशीब खराब होते आणि महिलांचा प्रॉब्लेम (पीरियडही) होता. तिसरा दिवस असूनही मी पूर्ण प्रयत्न केला, असेही ती म्हणाली.

Vinesh Phogat : आई, मला माफ कर; मी हरले! ‘सुवर्ण’स्वप्न भंगल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम

दुसरीकडे 3000 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्येही हिंदुस्थानच्या पदरी निराशा आली. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असणाऱ्या अविनाश साबळे याने सुरुवात चांगली केली. मात्र नंतर तो शर्यतीत मागे पडला. 8.14.18 ही वेळ नोंदवत अविनाश थेट 11व्या स्थानी फेकला गेला. यासह हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघाला जर्मन संघाने उपांत्यफेरीत पराभवाचा धक्का दिला.