ऑलिम्पिकवीर स्वप्नीलचा न्मभूमीत जयजयकार, करवीरकरांनी केले अभूतपूर्व स्वागत

ढोल-ताशांचा दणदणाट… हलगीचा कडकडाट… हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी… मिरवणूक मार्गावरील मनमोहक रांगोळय़ा… सजविलेल्या घोडय़ावरून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला… अशा भारावलेल्या आणि सळसळत्या उत्साहात ऑलिम्पिकवीर कांस्य पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्नील कुसाळेचा जन्मभूमीत करवीरकरांनी जयजयकार करत अभूतपूर्व स्वागत केले. सातासमुद्रापार पॅरिसमध्ये तिरंगा फडकाविणाऱया स्वप्नीलला पाहण्यासाठी करवीरवासीयांनी तुडुंब गर्दी केली होती. त्याची एक छबी टिपण्यासाठी तरुणांची अक्षरशः झुंबड उडाली होती.

खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वप्नील कुसाळेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. छत्रपती ताराराणी चौकात आल्यावर सर्वप्रथम स्वप्नीलने महाराणी छत्रपती ताराराणी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व्हिनस कॉर्नर येथे छत्रपती राजाराम महाराज, तसेच मिरवणुकीच्या अंतिम टप्प्यात दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळय़ाला स्वप्नीलने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी स्वप्नीलने राष्ट्रध्वज लपेटून उपस्थितांना वंदन करताच उपस्थितांनी प्रचंड जल्लोष करीत टाळय़ा, शिट्टय़ा व घोषणांनी दाद दिली.

झेंडूच्या फुलांच्या माळांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या वन विभागाच्या वाहनातून स्वप्नीलची मिरवणूक काढण्यात आली. या वाहनात स्वप्नीलची आई अनिता कुसाळे, वडील सुरेश कुसाळे यांच्यासह कुटुंबीय व प्रशिक्षक सोबत होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व स्वप्नीलचे कटआऊट्स लावण्यात आले होते. शहरातील मुख्य मार्गावर स्वप्नीलची मिरवणूक असल्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक पऱ्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. विद्यार्थी, युवा, आबालवृद्धांसह कोल्हापूरकरांच्या अलोट गर्दीत स्वप्नील कुसाळे याची भव्य आणि जंगी मिरवणूक पार पडली. त्याच्या स्वागताला खासदार, आमदारांसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व क्रीडाप्रेमी तसेच कोल्हापूरकरांची मोठय़ा संख्येने उपस्थित होती.