Photo – ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जंगी स्वागत

फोटो – चंद्रकांत पालकर

Paris Olypic 2024 मध्ये नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्यंपदक जिंकून आणणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जंगी स्वागत झाले. स्वप्नीलच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे – बालेवाडी, पुणे तर्फे एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


स्वप्नील कुसाळे कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा असून त्याने आपल्या कामगिरीने जगभरात महाराष्ट्र आणि कोल्हापूरची मान उंचावली आहे.


तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राचे वैयक्तिक पदकाचे स्वप्न साकार झाले आहे. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पहिलेवहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसराच महाराष्ट्रवीर ठरला आहे.


6 ऑगस्ट 1994 मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास रोमांचक होता. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता नववीत असताना स्वप्नीलने पहिले राज्यस्तरीय सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून त्याच्या ऑलिम्पिकच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. 2012 मध्ये स्वप्नीलची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली. तेव्हा वडिलांनी दीड लाखाचे कर्ज घेऊन मुलाला जर्मनीला पाठवले. त्या स्पर्धेत त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र त्याने पुन्हा कसून सराव केला आणि 2015 मध्ये 18 पेक्षा कमी वयोगटातील स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.


स्वप्नीलची आई कांबळवाडी गावच्या लोकनियक्त सरपंच आहेत. तर वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत. स्वप्नीलच्या या प्रवासामध्ये त्याच्या कुटुंबीयांनी त्याला वेळोवेळी साथ दिली आहे.

स्वप्नील कुसाळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात टीकिट चेकर म्हणून काम करतो. ऑलिम्पिकमध्ये त्याला मिळालेल्या यशाची दखल मध्य रेल्वेनेही घेतली आहे. मायदेशी परतल्यानंतर स्वप्नीलला ताबडतोब ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली आहे.