हिंदुस्थानींची भावना हॉकीतच गुंतलीय

क्रिकेटमध्ये पैसा आहे, प्रसिद्धी आहे, ग्लॅमर आहे. पण आजही हिंदुस्थानींच्या भावना हॉकीतच गुंतल्या आहेत. मान्य आहे हॉकीपटूंना क्रिकेटच्या तुलनेत काहीही मिळत नसेल, पण जे प्रेम हॉकीला मिळतेय, ज्या भावना हॉकीबद्दल आहेत, ते कुणाबद्दलही नाही. हिंदुस्थानी हॉकीबाबतीत खूपच भावनिक आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, अशी भावना हिंदुस्थानच्या विजयाच्या शिल्पकार असलेल्या गोलरक्षक श्रीजेशने व्यक्त केल्या.

आपला निवृत्तीचा निर्णय योग्य असल्याचे सांगताना तो म्हणाला, हीच योग्य वेळ होती आणि हाच तो क्षण होता. मी निवृत्तीचा घेतलेला निर्णय योग्य आहे आणि माझ्या निर्णयाला माझ्या संघ सहकाऱ्यांनी कांस्यपदक जिंकून संस्मरणीय केले आहे. गेली 24 वर्षे मी हॉकीच्या मैदानात धावतोय. गोलांचे रक्षण करतोय. निवृत्तीनंतर मला नक्कीच थोडे चुकचुकल्यासारखे वाटेल. पुन्हा मैदानात उतरावेसेही वाटेल. मी माझ्या कामगिरीबद्दल आणि कारकीर्दीबद्दल समाधानी आहे. भविष्यात मी माझ्या खेळासाठी जास्तीत जास्त काय करू शकतो, यासाठीही गांभीर्याने विचार करणार असल्याचेही श्रीजेश म्हणाला. 36 वर्षीय गोलरक्षक हिंदुस्थानसाठी 336 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने हजारांपेक्षा अधिक गोलांपासून संघाचे रक्षण केलेय. त्याच्याच नेतृत्वाखाली 2016 साली हिंदुस्थान रिओ ऑलिम्पिकमध्ये उतरला होता. पण या स्पर्धेत हिंदुस्थानला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्येही तो संघाचा गोलरक्षक होता आणि पॅरिसमध्येही त्याने तीच भूमिका निभावली. 2010 साली पहिला वर्ल्ड कप खेळल्यानंतर त्याने हिंदुस्थानच्या अनेक संस्मरणीय विजयात महत्त्वाची भूमिका साकारली होती. 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यातही त्याने सिंहाचा वाटा उचलला होता. 2022 ची राष्ट्रपुल आणि 2022 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या संघातही श्रीजेश होता.

52 वर्षंनंतर सलग दुसरे कांस्य

हिंदुस्थानचा सुवर्णकाळ परतावा म्हणून हॉकी संघाने जिवाचे रान केले, पण त्यांचे प्रयत्न थोडक्यात हुकले. गेली 44 वर्षे हिंदुस्थानी संघ सुवर्ण जिंकला नाहीय, पण आज सलग दुसरे कांस्य जिंकताना त्यांनी  52 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी साधली. हिंदुस्थानने सलग सहा सुवर्ण जिंकल्यानंतर 1968 आणि 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण त्या कामगिरीनंतर हिंदुस्थानचा हॉकी संघ सलग पदक जिंपू शकला नव्हता. एवढेच नव्हे तर 1980 च्या सुवर्णपदकानंतर तब्बल 40 वर्षांनी हिंदुस्थानने 2020 मध्ये कांस्यपदकाच्या रूपाने पदक जिंकले होते आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्येही ते कायम राखण्यात यश मिळवले. हिंदुस्थानने आपल्या ऑलिम्पिक इतिहासात आतापर्यंत आठ सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य जिंकले आहेत.