Paris Olympic 2024 : हिंदुस्थानला मोठा धक्का, वजन जास्त भरल्याने विनेश फायनलला मुकणार, पदकही हुकले

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक देत इतिहास घडविला. याचा हिंदुस्थान आनंद साजरा करत असताना हिंदुस्थानसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. विनेश फोगाट हिला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

विनेश फोगटने 50किलो फ्रिस्टाईल गटात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिली, तिने 50 किलो गटाच्या उपांत्य लढतीत क्युबाची मल्ल युस्नेलिस गुझमान हिचा 5-0 गुण फरकाने मागे टाकत ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे एक पदक निश्चित केले. ऑलिम्पिकच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारी विनेश ही पहिली हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू ठरली. मात्र विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अपात्र ठरली आहे. विनेश फोगात 52 किलो फ्रिस्टाइलच्या गटात खेळत होती मात्र तिचे वजन 100 ग्रॅम वाढल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियमानुसार वजन आटोक्यात असणे गरजेचे आहे मात्र 100 ग्रॅमने वजन वाढल्याने विनेश फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. त्यामुळे हिंदुस्थानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.