परीक्षेचा काळात शिक्षकांना पूर्णवेळ निवडणुकीच्या कामाला जुंपू नका, मुंबईतील पालकांची याचिका

मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. शिक्षकांना पूर्णवेळ निवडणुकीच्या कामाला जुंपू नका, अशी मागणी करणारी याचिका थेट पालकांनीच उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

कुर्ल्यातील ग्रीन मुंबई प्राथमिक शाळेतील पालकांनी ही याचिका केली आहे. निवडणूक कामांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग व महापालिकेने विविध परिपत्रके जारी केली आहेत. त्यानुसार शिक्षकांना पोलिंग बूथ व अन्य कामे देण्यात आली आहेत. निवडणूक संपेपर्यंत पूर्णवेळ शिक्षकांना ही कामे देण्यात आली आहेत. शाळेच्या कामकाजावर व परीक्षांवर याचा परिणाम होत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्या. अतुल चांदुरकर व न्या. मिलिंद साठय़े यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. वरील आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. शिक्षण विभागाच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे दिली आहेत. परिणामी शिक्षक शिकवणी सोडून निवडणुकीच्या कामाला जात आहेत. याने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत आहे. योग्य शिक्षण न मिळाल्यास मुलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे. शिक्षकांना पूर्णवेळ निवडणुकीचे काम देऊ नये, अशी मागणी याचिकेत केली.