Parbhani Incident – संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमाचा जाहीर निषेध – जयंत पाटील

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरूने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले असून या घटनेला आता हिंसक वळण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

जयंत पाटील यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले की, परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमाचा जाहीर निषेध करतो. समाजात अप्रवृत्ती बळावत चालली आहे. सरकारने लोकभावना प्रक्षोभित करणाऱ्या या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून अशा घटनांना भविष्यात आळा बसेल असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.