परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. या संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून परभणीत कडकडीत बंद होता. यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक काही भागात दगडफेकीच्या घटना समोर आल्या. पोलीस प्रशासन आणि आंदोलक यांच्यात काही भागात बाचाबाची झाली. तर काही भागात संतप्त जमावानं पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक करत विरोध दर्शवला. पोलिसांनी देखील आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. आता या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त आणि कडक करण्यात आला आहे. मात्र परभणीतील वातावरण यामुळे तापलं असून परिस्थिती चिघळण्याची व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच परभणी आणि आजूबाजूच्या भागातील इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्यात आली आहे. तसेच जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला आहे.
याआधी आज सकाळी आरपीआय सचिन खरात गटानच्या वतीनं भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यावेळी भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दलित विरोधी, संविधान विरोधी घटना घडत असतात हे राज्यातील आंबेडकरी जनतेला प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला होता.
दरम्यान, शहरातील एका भागात व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आल्याचं वृत्त आहे.
जमाव मोठ्या प्रमाणात उतरल्यानं पोलिसांच्या अनेक तुकड्या जागोजागी उभ्या करण्यात आल्या आहेत. दंगल नियंत्रण पथकही आता रस्त्यावर उतरले आहे. शहरातील आर.आर. टॉवर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचं कळत आहे. पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली असून हातात काठ्या घेऊन जमाव शहरात फिरताना दिसला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला जमाव
हे आंदोलन सुरू असताना एक गट जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला. तिथे काही जणांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरश: काचांचा खच पडल्याचं पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. दत्ता सोपान पवार (42, रा. मिर्झापूर, ता.जि. परभणी) असे माथेफिरूचे नाव आहे.
खासदार संजय जाधव यांचं आवाहन
या दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी संविधानाच्या विटंबनेबाबत संताप आणि निषेध व्यक्त करतानाच जनतेला शांतते बंद पाळावा आवाहन केलं आहे. ‘जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व बांधवांना विनंती करतो की, काल झालेली घटना ही दुर्दैवी व अत्यंत संतापजनक अशी आहे. झालेल्या घटनेचा निषेध करतो, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करतो. मात्र आपण सर्वजण निषेध व्यक्त करत असताना शांततेच्या मार्गाने बंद पाळावा अशी कळकळीची विनंती! जय भीम’, असं संजय जाधव यांनी X वर म्हटलं आहे.