वंचितांसाठी लढणार, कालिमातेचं रूप दाखवणार; भगवान भक्तिगडावरून पंकजा मुंडेंची गर्जना

मला जीवनात काही उभारता आले नाही, पण भगवान भक्तीगड उभा करण्याचे भाग्य मिळाले. समोर बसलेल्या समाजबांधवांनी मला जिंकल्यानंतर जी प्रतिष्ठा दिली, इज्जत दिली, तीच इज्जत पराभवानंतर दिली. आता थांबायचे नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे करायचे आहेत. वंचितासाठी लढायचे आहे, आता मी कालिमातेचं रूप दाखवणार आहे… असे म्हणत भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडेंनी गर्जना केली. भगवान भक्तीगडावरील मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजेच पहिल्यांदाच या गडावरील मेळाव्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र होते.

गत दहा वर्षांपासून सुरू असलेली भगवान भक्तीगडावरील परंपरा तेवढ्याच उत्साहात सुरू आहे. आज पहिल्यांदाच या मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, हा गड उभारण्याचे भाग्य मला मिळाले. माझा मुलगाही आज दर्शनासाठी सोबत आलाय. त्याला मी म्हणाले, तुझ्यापेक्षा मला समोर बसलेला जनसमुदाय जवळचा आहे. कारण माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तेव्हा माझ्यासाठी एका रात्रीत बारा कोटी रुपये जमा करणारा हा समाज आहे.

मी लोकसभेला पराभूत झाल्यानंतर माझ्या पाच लेकरांनी जीव दिलेला आहे. या मेळाव्यासाठी मी कोणालाही निमंत्रण देत नाही. तरी स्वयंस्फूर्तीने सर्वजण येतात. तुम्ही मला जिंकल्यानंतर जी इज्जत दिली तीच इज्जत पराभवानंतरही दिली. हा ऊसतोड मजुरांचा, जिगरबाज लोकांचा मेळावा आहे. आता मी म्हणाल्याशिवाय ऊस तोडायला जायचे नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचीही उपस्थिती

भगवान भक्तीगडावर आज पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह प्रीतम मुंडे, सुजय विखे, सुरेश धस, भीमराव धोंडे, महादेव जानकर यांच्यासह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती होती.

मी कोणाच्याही बापाला भीत नाही

मी भिते फक्त ज्या दिवशी लोक भाषणाला समोर नसतील त्या दिवसाला. जात बघून मदत करणारे आम्ही नाही, असे म्हणत मी राजकारणाला चिकटून बसणाऱ्यांपैकी नाही, त्रास दिला तर त्याचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही, आता कंबर बांधा आणि दिवाळी झाल्याशिवाय ऊस तोडायला जाऊ नका, मला आता वंचितांसाठी लढायचे आहे आणि कालिमातेचे रूप दाखवायचे आहे, असे त्या म्हणाल्या.