महिला अत्याचाराच्या घटना गेल्या दहा वर्षांत वाढल्या, आमदार पंकजा मुंडे यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर बोट

निर्भया ते बदलापूर हा घटनाक्रम पाहाता गेल्या दहा वर्षांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

आमदार मुंडे काल (दि. 28) श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बदलापूर अत्याचार घटनेबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना आरोपीला भर चौकात फाशी द्यायला हवी, अशी मागणी केली.

अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत, अशी चिंता व्यक्त करत गेल्या दशकात यात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट करीत पंकजा मुंढे यांनी राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्या कारभारावर अप्रत्यक्ष बोट ठेवले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील स्मारकाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा पडला, याबाबत विचारणा केली असता, पुतळा कसा पडला, याबाबत संबंधित मंत्री, अधिकारी आणि ज्यांनी पुतळा उभा करण्याचे काम केले, त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी अधिक बोलण्याची गरज नाही. लवकरच नवीन पुतळा बसवण्याची कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे याही उपस्थित होत्या. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आमदार मुंडे यांचा सत्कार केला.