पन्हाळा गडाला जागतिक वारसा मिळण्याची अपेक्षा; युनेस्को पथकाकडून किल्ल्याची पाहणी

जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱयांसह युनेस्कोच्या पथकाने धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, तीन दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक स्थळी भेट दिली.

किल्ल्याचा इतिहास आणि सद्यःस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱयांकडून तपशीलवार माहिती घेतली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, अतिरिक्त महानिर्देशक जागतिक वारसा (एएसआय) जानवीश शर्मा, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, डॉ. शुभा मजुमदार यांचा समावेश होता. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या 12 निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेल्या पन्हाळा गडाला जागतिक वारसा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरू असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी पन्हाळा संवर्धनासाठी स्वच्छता व प्रशासनाने दिलेल्या सूचनांबाबत साहाय्य केले असून, यापुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.