पालघरमधील सातपाटी-खारेकुरण-मुरबा खाडीत औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी सोडले जाते आहे. प्रदूषित पाण्यामुळे खाडीतील हजारो मासे मृत झाले. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात स्थानिक मच्छीमारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधून समुद्र आणि खाड्यांमध्ये सोडले जाणारे पाणी न थांबवल्यास उग्र आंदोलन पुकारण्याचा इशारा ‘महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती’ आणि ‘नॅशनल फिशरमन्स पह्रम’च्या वतीने देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी सातपाटी-खारेकुरण-मुरबा खाडीत हजारोंच्या संख्येने मासे मरून पडले होते. यावर कोणती कारवाई झाली याचा जाब विचारण्यासाठी ‘महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती’चे कार्याध्यक्ष व ‘नॅशनल फिश वर्कर्स पह्रम’चे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल, फोरमच्या चिटणीस ज्योती मेहेर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयवंत तांडेल, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे अध्यक्ष जगदीश नाईक ,अखिल वैती समाज संस्थेचे अध्यक्ष वैभव भोईर, अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचे सरचिटणीस प्रशांत नाईक, खारेकुरण मच्छीमार संस्थेचे चेअरमन जयकुमार भाय, वरील संघटनेचे प्रतिनिधी पुंदन दवणे, नारायण तांडेल, गणेश तांडेल, हर्षदा तरे, गुणवंत माच्छी, सुनील चौधरी, प्रदीप नाईक, दिनेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयावर धडक मारली. नवापूर पाईपलाईन, औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचे नाले यांच्यामार्फतसुद्धा रसायनमिश्रित केमिकलचे पाणी समुद्रात व खाडी खाजनात सोडले जाते याकडे महामंडळातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
लवकरच प्रत्येक नाल्यांवर औद्योगिक महामंडळाच्या वतीने बांध घातले जातील. त्यामुळे प्रदूषित सांडपाणी नाले, खाडी व समुद्रात जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन एमआयडीसीकडून देण्यात आले.
यापुढे प्रदूषित पाणी पुन्हा खाड्यांमध्ये सोडले जाणार नाही याची जबाबदारी एमआयडीसीने घ्यावी. अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल, अशा इशारा यावेळी महामंडळाला देण्यात आला.