आश्वासन देऊनही प्रत्यक्षात तिकीट न मिळाल्यामुळे मिंधे गटाचे जगदीश धोडी यांनी बोईसरमधून व प्रकाश निकम यांनी विक्रमगडमध्ये बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच भाजपचे अमित घोडा यांनीदेखील पालघर विधानसभा मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकवले. मात्र उमेदवारी अर्ज भरून हे तिघेही बंडोबा बेपत्ता झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी घोडा, धोडी व निकम यांच्यावर दबाव येत असल्याने ते नॉटरिचेबल झाले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोण राहणार याचा फैसला आता फक्त काही तासांवर असल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे.
पालघर जिह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा व वसई असे सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी बहुतेक ठिकाणी बंडाचे ग्रहण मिंध्यांना लागले आहे. श्रीनिवास वनगा यांना मिंध्यांनी उमेदवारी नाकारल्याने ते प्रसारमाध्यमांसमोर अक्षरशः ढसाढसा रडले. या नैराश्यातून ते बेपत्ता झाले. तीन दिवसांनंतर पुन्हा घरी परतले. आता वनगांच्या पाठोपाठ मिंधे गटाचे जगदीश धोडी व प्रकाश निकम हेदेखील नॉटरिचेबल झाल्याने अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. ते नेमके कुठे गेले, कोणाच्या सांगण्यावरून गेले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पालघरमध्ये विचारले जात आहेत.
…तर महायुतीला मोठा फटका
मिंधे गटातून तिकीट न मिळाल्यामुळे प्रकाश निकम हे नाराज असून त्यांनी विक्रमगडमधून भाजपचे हरिश्चंद्र भोये यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. जगदीश धोडी हेदेखील बोईसरमध्ये प्रबळ दावेदार होते. मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले गेले. त्यांनी मिंध्यांचेच उमेदवार विलास तरे यांच्याविरुद्ध बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थोडा कालावधी उरल्याने या तीनही बंडोबांना पक्षश्रेष्ठाr कसे थंड करणार अशी विचारणा होत आहे. त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास त्याचा फटका महायुतीला बसणार आहे.
प्रदेशाध्यक्ष म्हणतात, ते फोन सुरू करतील
भाजपचे अमित घोडा यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; पण तेदेखील गेल्या 24 तासांपासून नॉटरिचेबल झाल्याने डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी अमित घोडा हे सध्या भाजपमध्येच असून ते लवकरच आपला पह्न सुरू करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या माघारीची आशा मिंध्यांना दाखवली.