चीन आणि रशियाचा टेकू घेणारा पाकिस्तान तोंडावर आपटला, हिंदुस्थानमुळे BRICS मध्ये नो एन्ट्री

चीन आणि रशियाचा टेकू घेऊन BRICS मध्ये सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. हिंदुस्थानने घेतलेल्या कडक भुमिकेमुळे पाकिस्तानला ब्रिक्समध्ये प्रवेश मिळाला नाही. तसेच भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान देण्यात आले नाही.

पाकिस्तानने मागच्या वर्षी ब्रिक्समध्ये सदस्य होण्यासाठी औपचारिक अर्ज केला होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या 16 व्या ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानचा अर्ज फेटाळून लावला असून त्यांना भागीदार देशांच्या यादीतही स्थान देण्यात आले नाही. दुसरिकडे, तुर्की देशाला भागीदार देशांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, चीन आणि रशियाने पाकिस्तानला सदस्यत्व मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. मात्र पाकिस्तानला सदस्यत्व देण्यास हिंदुस्थान तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुस्थानने घेतलेल्या कडक भुमिकेमुळे पाकिस्तानच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

GDP चा विचार करता जगातील एकूण जीडीपी पैकी 30 टक्के वाटा ब्रिक्स समूहाचा आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातील सर्वात प्रभावशाली ब्रिक्स समूहाचे सदस्य होऊन गंडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या पाकिस्तानचा प्रयत्न होता. परंतु ब्रिक्स समूहाचे सदस्यत्व नाकारल्यामुळे पाकिस्तान तोंडावर आपटला आहे.