दिवाळीत जादा भाडे आकारणाऱ्या बसेसला चाप; पुणे, पिंपरी आरटीओची पाच वायुवेग पथके तैनात

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांकडून अवाच्या सवा भाडेदर आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईसाठी आरटीओ प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पुणे आरटीओने दोन आणि पिंपरी-चिंचवड आरटीओ प्रशासनाने तीन अशी एकूण पाच वायुवेग पथके तैनात केली असून, जादा भाडे आकारणी तसेच इतर नियमभंग करणाऱ्या बसेसवर या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे.

शहर परिसरातील महत्त्वाच्या स्थानकांवर ही पथके गस्त घालणार आहेत. राज्यातील अनेक भागांतील नागरिक, विद्यार्थी नोकरी तसेच शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. दिवाळीत बाहेरगावी राहणारे विद्यार्थी, नोकरदार आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे या कालावधीत गावी जाणाऱ्या नागरिकांचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी केली जाते. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला ऐन सणासुदीत झळ बसत असून, मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी प्रशासनाकडून हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र, यंदा ही हंगामी भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा एसटी बसेसमध्ये जादा गर्दी पाहण्यास मिळणार आहे. दिवाळी सुट्टीत रेल्वे, एसटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून जातात. परिणामी, नाईलाजास्तव नागरिकांना खासगी टुर्स, ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो.

प्रवाशांची गरज आणि गर्दीचा गैरफायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे अशा जादा दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आरटीओ प्रशासनाने पथके तयार केली आहेत. त्या माध्यमातून जादा भाडे आकारणे, मान्यतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, गाडीच्या रचनेत बदल करणे, वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ही पथके तैनात असतील, असे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागरिकांनो इथे करा तक्रार
एसटी महामंडळाच्या दरापेक्षा दीडपट भाडे घेण्यास खासगी बस चालकांना परवानगी आहे. मात्र, यापेक्षा अधिक भाडे घेतल्यास प्रवाशांना आरटीओच्या हेल्पलाइनवर तक्रार करता येणार आहे. यासाठी पुणे आरटीओने ८२७५३३०१०१, तर पिंपरी [email protected] हा मेल उपलब्ध करून दिला असून, यावर नागरिकांना तक्रार करता येणार आहे. तिकिटाचा फोटो, मोबाईल नंबरसह नागरिकांनी तक्रार करावी. नियमापेक्षा अधिक भाडे घेणाऱ्या बसेसवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी तीन पथके तयार केली असून, या माध्यमातून ही कारवाई केली जाईल.
संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

खासगी बसेसची तपासणी करून कारवाईसाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. दीडपट रकमेपेक्षा जादा भाडे आकारल्यास कारवाई केली जाणार आहे.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन परिवहन अधिकारी, पुणे.