महायुती सरकारविरोधात दूध उत्पादकांचा आक्रोश, पारनेर व शिरूर तालुक्यातील दूध उत्पादक रस्त्यावर

दिवसेंदिवस दुधाच्या दरात घसरण होत असल्याने संतप्त झालेल्या पारनेर व शिरूर (पुणे) तालुक्यातील दूध उत्पादकांनी नगर व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर टाकळी हाजी येथे रास्ता रोको आंदोलन केले.सरकार विरोधी घोषणा देत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

उत्पादन खर्चावर आधारित दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही धडा शिकवला जाईल असा इशारा संतप्त दूध उत्पादकांनी दिला. दूध आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,लढू न्याय्य हक्कासाठी,जिंकू शेतकरी राजासाठी, नको आम्हाला फुकटच दान, द्या कष्टाच मोल,अशा घोषणांचे फलक घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

सरकारने दुधाला किमान 40 रूपये प्रति लिटर हमीभाव द्यावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत, जानेवारी महिन्यात जाहीर केलेेले दुधाचे अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दहा ते बारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी अतिशय आक्रमक भाषणे करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचे वाभाडे काढले.दुधाला कवडीमोल भाव मिळत असताना दुसरीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत.दूध उत्पादक आर्थिक मेटाकुटीला आले आहेत.वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.शेतमालाला भाव नाही. नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याला भाव नाही. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने परदेशामध्ये कांद्याला चांगला भाव असतानाही निर्यात करता येत नाही. शेतीचा जोडधंदा असलेल्या दुधालाही भाव नसल्याने या सरकारचे काय करायचे असा सवाल यावेळी करण्यात आला.शहरी ग्राहकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप सत्ताधारी महायुतीच्या सरकारने केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलनात युवा सेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष तथा शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, दिलीप सोदक, सोमाशेट भाकरे, सरपंच दामू अण्णा घोडे, बन्सीनाना घोडे, रूपेश ढवण, महेंद्र पांढरकर यांच्यासह शेकडो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

गायींच्या किमतीही उतरल्या

गेल्या आठ महिन्यांपासून दुधाचे दर कोसळले आहेत. ज्या गायीची किंमत सव्वा लाख रूपये होती,त्याच गाईची किंमत आज 50 ते 60 हजार रूपयांपर्यंत खाली आली आहे. एकीकडे दुधाचे दर कोसळलेले असताना दुसरीकडे गायांची किंमतीही कमी झाल्याने त्यातून होणारा तोटाही दूध उत्पादकांना सोसावा लागत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

अनुदान कधी मिळणार

दर कोसळल्यानंतर शासनाने अनुदानाची घोषणा केली. हे अनुदान ठराविक शेतकऱ्यांना मिळाले मात्र ते देखील पुर्णपणे मिळाले नाही. मोठ्या प्रमाणावर शेतकरी या अनुदानापासून आजही वंचित आहेत. केवळ घोषणा करणारे सरकार शेतकऱ्यांना कधी अनुदान देणार असा सवाल यावेळी करण्यात आला.