महिला सायकलपटूंसाठी सीएएमची शोधमोहीम, बारामतीत सायकलिंगच्या महिला लीगचे आयोजन

सायकलिंग खेळात मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी आणि गुणवान, वेगवान सायकलपटूंचा शोध घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने वुमेन्स लीग म्हणजेच महिला लीग सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या 20 आणि 21 सप्टेंबरला हिंदुस्थानी सायकलिंग महासंघाच्या (सीएफआय) मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र सायकलिंग संघटनेने (सीएएम) या स्पर्धा बारामती येथे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आयोजित करणार आहेत.

या स्पर्धेच्या माध्यमातून मुलींच्या क्रीडागुणांना वाव देणे, स्पर्धांचा सराव होणे आणि त्यामधून गुणवान महिला खेळाडूंची निवड करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा पेंद्र सरकारचा उद्देश आहे. प्रथम विभागीय स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सायकलिंग खेळाच्या ‘वुमेन्स लीग’ स्पर्धा रोड आणि ट्रक प्रकारात होणार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार विभागात या स्पर्धा होतील, अशी माहिती सीएफआयचे उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे संघटन सचिव सचिव प्रताप जाधव यांनी दिली. या स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनीअर अशा वयोगटात खेळवल्या जाणार आहेत.

पश्चिम विभागाची रोड प्रकारामधील दुसरी स्पर्धा बारामती येथे पाटस ते लिमटेक गावादरम्यान नवीन तयार होत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 20 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता पार पडेल.

या स्पर्धा टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट या प्रकारात होणार असून सर्व वयोगटात विदेशी किंवा हिंदुस्थानी बनावटीच्या सायकल  वापरता येतील. स्पर्धेमधील विजेत्यांना एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची रोख पारितोषिके पेंद्र सरकारच्या वतीने दिली जाणार आहेत.