देशभरात आज पावसाची धुवाँधार बॅटींग; महाराष्ट्र, दिल्लीसह 23 राज्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज पाऊस ‘धुवाँधार’ हजेरी लावणार आहे. राजधानी दिल्लीत गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढताच असल्यामुळे राजधानीत जागोजागी पाणी साचले आहे. अशातच हवामान खात्याने दिल्ली, महाराष्ट्रासह एकूण 23 राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये अतिमुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचवेळी दक्षिण हिंदुस्थानातील राज्ये तसेच गुजरात, राजस्थानचा काही भाग तसेच जम्मू-कश्मीरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

दिल्लीत रेकॉर्डब्रेक पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमानतळावर छत कोसळण्यापासून भूस्खलनापर्यंत अनेक अपघात झाले. त्यात अनेक दिल्लीकरांना प्राण गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी भिंती, रेलिंग, झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत.

याचदरम्यान दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कोतवाली सूरजपूर परिसरातील खोडाना खुर्द गावात बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत.

हवामान खात्याचा अलर्ट

ऑरेंज अलर्ट – महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, गोवा, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, आसाम, मेघालय, ओडिशा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड.

रेड अलर्ट – अरुणाचल प्रदेश