काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी राजकीय विरोधकांकडून ‘काळी जादू’, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा आरोप

कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी राजकीय विरोधकांकडून केरळमधील राज राजेश्वरी मंदिराजवळ अघोरी तांत्रिक आणि मांत्रिकांकडून काळी जादू केली जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज केला.

राजकीय विरोधक त्यांच्या आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात काळी जादू करत असल्याची विश्वासार्ह माहिती त्यांच्याजवळ असल्याचा दावा शिवकुमार यांनी केला. काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी माझ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे काळय़ा जादूचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

– राजराजेश्वरी मंदिराजवळ एका निर्जन ठिकाणी ‘अघोरीं’द्वारे होमहवन, विशेष तंत्रविधी केले जात आहेत. यज्ञाचा मुख्य उद्देश शत्रूंचा नायनाट करणे हा असून या विधीला ‘राजा पंटक’ आणि ‘मरण मोहना स्तंभ’ यज्ञ म्हणतात. या तंत्रविधीत सहभागी झालेल्यांनीच या घडामोडींची माहिती दिली.

बकऱया, म्हशी, काळय़ा मेंढय़ा, डुकरांचा बळी

अघोरींच्या माध्यमातून 21 लाल बकऱया, तीन म्हशी, 21 काळय़ा मेंढय़ा, पाच डुकरांचा बळी शत्रू भैरवी यज्ञात दिला गेल्याची माझी माहिती आहे. शत्रूचा समूळ नाश करण्यासाठी या यज्ञात पंचबळी देण्यात येत असतात, असे ते म्हणाले. मी नावे सांगण्यापेक्षा मीडियानेच तिथे जावे आणि या व्यक्तींची नावे शोधावीत, असे ते म्हणाले.