गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, कायदा-सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी

देशात एकूण 35 लाख 61 हजार 379 गुन्हे दाखल झाले असून त्यातील 3 लाख 74 हजार 38 गुन्हे एकट्या महाराष्ट्रात घडले आहेत. हा दर 10.2 टक्के इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आला आहे. मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर फक्त काही विशिष्ट भागात चालत असून ते कामापेक्षा शोबाजी करत आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260च्या प्रस्तावावर बोलताना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसह सरकारने केलेल्या विविध घोषणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, देशात स्त्री अत्याचाराचे 4 लाख 45 हजार गुन्हे दाखल झाले असून 45 हजार गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत. ऑसिड हल्ले, सायबर गुन्हे यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. एकीकडे सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली; मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप दानवे यांनी केला.

सरकारच्या घोषणा फक्त कंत्राटदारांच्या हितासाठी

सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, या घोषणा सर्वसामान्यांसाठी नाहीत, तर कंत्राटदारांच्या हितासाठी करत आहेत. सरकार राज्याच्या विकासासाठी काम करत नसून स्वार्थ आणि भ्रष्टाचारासाठी काम करत असल्याचे दिसते. गृह विभाग हे विशिष्ट अधिकारी, कंत्राटदार यांच्यासाठी काम करते, की प्रस्ताव समोर ठेवून काम करते, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. दरम्यान, सरकारच्या विकासाच्या घोषणा या फक्त मुंबई, पुणे शहरापर्यंत मर्यादित असून ग्रामीण भागाचाही विकासाच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

मोपलवारांना मुदतवाढ का दिली?

समृद्धी महामार्गाच्या कामात राधेश्याम मोपलवार या अधिकाऱ्याला मुदतवाढ का दिली गेली? मूठभर लोकांच्या समृद्धीसाठी अलिबाग-सिंधुदुर्ग कॉरिडॉरचे काम हाती घेतले गेले. या रस्ताच्या विकासाच्या नावाखाली भूसंपादन करून चढ्या दराने जमिनी विकायचा व्यवसाय सुरू झाला आहे. कॅगने संजय मुखर्जी यांच्यावर ठपका ठेवला असताना सिडको, एमएमआरडीएसारख्या ठिकाणी त्यांची नेमणूक का केली? हे अधिकारी सरकारी जावई असल्यासारखे वागत असून त्यांना मराठवाड्यात पोस्टिंग का देत नाही, असा सवाल दानवे यांनी केला.

राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढला

नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात संथगतीने सुरू असलेला तपास, ग्रामीण भागात अवैधपणे सुरू असलेली गर्भलिंग चाचणी व गर्भपाताच्या घटना, शिरुर रांजणगाव येथे 350 रोहित्रांची झालेली चोरी, पोलीस विभागात सुरू असलेले ई चलनमधील गैरव्यवहार, राज्याचे मद्य धोरण, बांधकाम विभागातील कोटय़वधी रुपयांच्या निविदा, विविध औद्योगिक वसाहतीत झालेले स्पह्ट, ऊर्जा विभागातील सबसिडीच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार, क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांची भ्रष्ट कारकीर्दप्रकरणी अंबादास दानवे यांनी गृहविभागावर ताशेरे ओढले.