एक हजार सिलिंडर, 713 हातगाडय़ा जप्त, बेकायदा फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम

मुंबई महानगरपालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून गेल्या आठवडाभरात तब्बल 1037 सिलिंडर, 713 हातगाडय़ा जप्त केल्या आहेत. तर परिणामकारक कारवाईसाठी आता अनुज्ञापन विभागातील निरीक्षकांच्या डय़ुटीचे नवीन शेडय़ुल तयार करण्यात येणार असून झालेल्या कारवाईची उपायुक्तांकडून झाडाझडती घेतली जाणार आहे.

मुंबईत बेकायदा फेरीवाल्यामुळे नागरिकांना चालणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे फुटपाथवर कब्जा करणाऱया फेरीवाल्यांविरोधात पालिकेने धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिका हद्दीतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यांवर कठोर करावी; अनधिकृत फेरीवालेमुक्त मुंबई करावी, जेणेकरून मुंबईकर नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल; पादचाऱयांसाठी पदपथ मोकळे करावेत, असे स्पष्ट निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

अशी झाली कारवाई

1) चारचाकी हातगाडय़ा – 713
2) सिलिंडर – 1,037
3) स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे व साहित्य – 1,246
एकूण जप्त साधनांची एकूण संख्या – 2,996