दाना चक्रीवादळाचा कहर; 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

अंदमानच्या सागरातून उठलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. उद्या या वादळामुळे पाच राज्यांमध्ये प्रचंड नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर 14 जिह्यांतील 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सहा हजार मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर तब्बल 150 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून पाच राज्यांत एनडीआरएफची 56 पथके मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांच्या समुद्र तटीय भागांमध्ये तुफान पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. 24 आणि 25 ऑक्टोबर असे दोन दिवस या वादळाचा कहर दिसू शकतो. अनेक भागांत भूस्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

14 जिह्यांमथील शाळा-कॉलेजना 25 ऑक्टोबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ओडिशामध्ये जवळपास सहा हजार मदत छावण्या उभारण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी दिली. तीन हजारांहून अधिक पर्यटकांना परत पाठवण्यात आले असून हॉटेल बुकिंग पुढचे चार दिवस थांबवण्यात आल्या आहेत.