ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; सोहळ्याला राहुल गांधी, प्रियंका गांधींची उपस्थिती

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशचे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फ्रन्स सेंटमध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

सुरेंद्र चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच सकीना इट्टू, जावेद राणा, जावेद डार, सतीश शर्मा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर ओमर अब्दुल्ला दुपारी तीन वाजता प्रशासनातील सचिवांसोबत बैठक घेणार आहेत. काँग्रेसने ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या एकही मंत्री सरकारमध्ये नसेल. पण जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवण्यासाठीचा लढा सुरूच राहील, असे काँग्रेसने म्हटले आहे.

शपथविधी सोहळ्याला 50 हून अधिक VIP

शपथविधी सोहळ्याला ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, आपचे नेते संजय सिंह, सीपीआयचे नेते डी. राजा यांच्यासह अनेक मोठे नेते यावेळी उपस्थित होते.