ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर  शपथ सुरिंदर कुमार चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली. काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी होणार नाही, त्यांचा एकही आमदार मंत्री होणार नाही, असा निर्णय घेतला आहे. जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसच्या चार माजी मंत्र्यांमध्ये तारीक अहमद कर्रा, माजी प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर, दुसरे माजी प्रदेशाध्यक्ष पिरझादा मोहम्मद सय्यद आणि निझाम उद्दीन बट हे चार आमदार आहेत.

काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा

काँग्रेसने सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी मोदी सरकारकडे वारंवार केली. परंतु, केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्यातरी आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, अशी माहिती जम्मू-कश्मीरचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारीक हमीद कर्रा यांनी दिली. तर काँग्रेस मंत्रिमंडळाच्या बाहेर नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहू, चर्चा सुरू असेपर्यंत मंत्रिमंडळात जागा मोकळी ठेवली जाईल, अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी

नायब सिंह सैनी हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज भाजपच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.. त्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाने राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. गुरुवारी सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे.