जुन्या पेन्शनसाठी एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर करणार आत्मक्लेश आंदोलन

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने जुन्या पेन्शन योजनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 7 ऑक्टोबरला एल्गार पुकारला आहे. मोठय़ा संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत.

शासन स्तरावर ईपीएस 95 बाबत योग्य तो निर्णय घेऊन पेन्शनपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ  मिळावा, कामगार करारात मंजूर झालेल्या तरतुदींनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती महामंडळाने करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मिळावा आणि तो सर्व प्रकारच्या गाडय़ांमध्ये चालावा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे एकरकमी देण्यात यावेत अशा विविध मागण्या सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी दिली. वेतनवाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे अद्याप देण्यात आलेले नसून हा भार अंदाजे 300 कोटी रुपयांचा आहे, असे त्यांनी सांगितले.

z नियमित कर्मचाऱ्यांना नुकतीच 2020 पासून नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे. यादरम्यान निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढलेली वेतनश्रेणी, महागाई भत्ता आणि घरभाडे अशी जी काही फरकाची रक्कम होईल ती एकरकमी मिळावी अशीही सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची महत्त्वाची मागणी आहे.

z केंद्र सरकारची तुटपुंजी पेन्शन, सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेली अल्प अशी रक्कम यात खर्च भागवताना निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था झाल्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.