पाठीत वार करत गद्दारी करणारे आता मुख्यमंत्री आहेत; आदित्य ठाकरे यांचा मिंध्यांवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. बुधवारी हातकणंगलेत महानिष्ठा, महान्याय संवाद दौऱ्याच्या झंझावातात त्यांनी मिंध्यांवर जहरदस्त प्रहार केला. आपल्या सभेत होणाऱ्या गर्दीमुळे खुर्च्या वाढवाव्या लागतायत, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत गर्दीअभावी खुर्च्या हटवाव्या लागतात, अशा शब्दांत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेची खिल्ली उडवली.

आमदार अपात्रतेबाबत लवकरच महत्वाचा निर्णय येणार आहे. तो निर्णय काय येईल तो येईल, पण आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहोत, असे म्हणत महाराष्ट्राच्या पदरात काही चांगले पडले आहे का, अच्छे दिन आले का, असा सवाल केला. सर्वत्र महागाई वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत, असा घणाघात त्यांनी खोके सरकारवर केला.

कोरोना काळात राज्य पुढे कसे न्यायचे, विकास कसा करायचे, हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले. त्यामुळे जागतिक पातळीवर उद्धव ठाकरे यांचे कौतुक झाले. कोरोनात जात पात न पाळता त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली. एवढ्या संकटातही महाराष्ट्र मागे का जात नाही, हा भाजपचा पोटशूळ होता. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात दंगल झाली नाही. अशा परिस्थितीत भाजपला 40 गद्दारांची साथ मिळाली. मिंधे सरकारचा भोंगळ कारभार आणि महाविकास आघाडी काळातील कामांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि खोके सरकारवर टीका केली.

…तर ते मंत्रालय गुजरातला घेऊन जातील
मिंधे सरकारने सगळे उद्योग गुजरातला नेले आहेत. हे खोके सरकार पुन्हा आले तर मंत्रालय गुजरातला घेऊन जातील. त्यांनी धमकावून, जबरदस्तीने सगळे उद्योग गुजरातला नेले. ते प्रकल्प महाराष्ट्रात आले असते तर लाखो रोजगार उपलब्ध झाले असते. आमचे सरकार असते तर वेदांता फॉक्सकोन कंपनी गुजरातला गेली नसती, पण त्या जात असताना इतका अकार्यक्षम मंत्री मी कधीही पाहिला नाही, अशा शब्दांत त्यांनी मिंधे सरकारवर हल्लाबोल केला.

जे पाठीत वार करून गेले, ते आता मुख्यमंत्री आहेत
आम्ही आज जो न्याय मागत आहे तो शिवसेनेसाठी नाही तर राज्यासाठी, देशासाठी न्याय मागत आहोत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या संविधानाने निर्णय देणार असतील तर गद्दार आमदार अपात्र होणारच. जे उद्धव ठाकरे यांच्या पाठीत वार करून गेलेत,ते आता मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर ईडीची धाड पडली होती. ते तुरुंगात जाणार होते, भीतीने त्यांनी गद्दारी करत भाजपशी हातमिळवणी केली, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

इथल्या आमदार, खासदारांना काय कमी केले होते ?
राष्ट्रवादी काँग्रेस काम करू देत नाही. हिंदुत्वाचे कारण सांगितले जायचे, पण यांचे हिंदुत्व खरे आहे , असा सवालही त्यांनी केला. आमचे हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम हे आहे. कोल्हापुरातील एक गद्दार माजी आमदार घरात घुसून मारहाण करतो, पण कोणतीही कारवाई केली जात नाही, असे म्हणत गद्दार आमदार, खासदारांवर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.