आता रेल्वेचे तिकीट बुक करा 60 दिवस आधी, रेल्वे मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

प्रातिनिधीक - फोटो

गणपती, होळीसाठी गावी जाण्याकरिता चाकरमान्यांना चार ते पाच महिने आधी तिकीट बुक करावे लागते. ऑनलाइन विंडो ओपन झाली की तिकीट बुक करण्यासाठी अक्षरशः उडय़ा पडतात. रेल्वेमध्ये किमान 120 दिवस आधी तिकीट बुक करण्याचा नियम आहे, परंतु आता इतक्या आधी तिकीट बुक करण्याची गरज नाही. कारण आता रेल्वेचे तिकीट केवळ 60 दिवस आधी बुक करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतची अधिसूचनाही जारी केली आहे.

आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली आहे. तिकीट आरक्षित करण्यासाठीची मुदत 120 दिवसांवरून 60 दिवस करण्यात आली आहे. यात प्रवासाचा दिवस वगळण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने एआरपी म्हणजेच अॅडव्हान्स रिझर्व्हेशन पीरियड दोन महिन्यांनी कमी केला आहे. रेल्वेचा नियम येत्या 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. हा नवा नियम भारतीय नागरिकांसह परदेशी प्रवाशांनाही लागू होणार आहे. ज्या रेल्वेगाडय़ांचा एआरपी आधीच कमी आहे त्यावर नव्या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही. यात गोमती एक्स्प्रेस आणि ताज एक्स्प्रेससारख्या गाडय़ांचा समावेश आहे.

म्हणून बदलला रेल्वेने नियम

बऱयाचदा गाडय़ा रद्द झाल्यास किंवा चार महिन्यांच्या कालावधीत प्रवाशांची फिरायला जाण्याची योजनाच रद्द झाली तर प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तिकिटाचे पैसे मिळवण्यात अडचणी येतात. त्यामुळे एआरपीएच्या नियमात बदल करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. लोकांचे प्रवासाचे नियोजन सोपे व्हावे, लोकांना रेल्वेचा अधिकाधिक वापर करता यावा आणि त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, तिकीट रद्द करण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अशा अनेक कारणांमुळे नियमांत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, तिकीट आरक्षणाचा कालावधी कमी करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून आणि सामान्य प्रवाशांकडून सातत्याने होत होती. या मागणीचा विचार करून रेल्वेने नियमात बदल केला आहे.