राज्यात 22 जिह्यांवर दुष्काळाचे सावट; बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे धरणे आटली, नद्या सुकल्या

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान 30 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत वाढले असून हवेच्या कमी दाबामुळे अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान 40 डिग्री सेल्सियसहून अधिक आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळे आणि बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे धरणे आटली असून नद्यांच्या पाण्याची पातळीही खोल गेली आहे, तलाव कोरडेठाक पडले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. या भीषण परिस्थितीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तब्बल 22 जिह्यांवर दुष्काळाचे सावट घोंगावत असल्याचे चित्र आहे.

कापूस आणि सोयाबीनच्या पिकांचे प्रचंड नुकसान

विदर्भ, मराठवाडय़ात पाण्याअभावी तब्बल 42 लाख हेक्टर जागेवरील कापसाच्या पिकांचे आणि 22 लाख हेक्टर जागेवरील सोयाबीनच्या पिकांचे आतोनात नुकसान झाल्याची माहिती किसान सभेचे नेते किशोर तिवारी यांनी दिली. तर अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नळ योजनेचा बोजवारा उडाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मराठवाडय़ात मोसंबी तसेच अनेक फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले. पाणी नसल्यामुळे निराश झालेल्या अनेक शेतकऱयांनी फळझाडे उपटून टाकल्याचे चित्र आहे.

13 एप्रिलपर्यंत अवकाळीची भीती

कडक उन्हाळा आणि पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात रब्बी पिकांची काढणीची, मळणीची वेळ आली असताना उद्यापासून 13 एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाडय़ावर अवकाळीचे सावट असल्याचे कृषी हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

या जिह्यांमध्ये पावसाची शक्यता

नगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशीव, परभणी, पुणे, सातारा, सोलापूर, वाशीम, यवतमाळ या जिह्यांत पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे.

तीन महिन्यांत 222 शेतकऱयांच्या आत्महत्या

गेल्या तीन महिन्यांत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 222 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे किसान सभेचे नेते किशोर तिवारी यांनी सांगितले. कापूस आणि सोयाबीनचे पीक घेणाऱया शेतकऱयांवरही लाखोंचे कर्ज आहे.

39.76 टक्के पाणीसाठा शिल्लक

राज्यातील सहा महसूल विभागांतील धरणांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. मार्च महिन्याच्या शेवटी धरणांमध्ये 39.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्या वर्षी याच काळात हाच साठा 55.85 टक्के इतका होता. सातारा जिह्यासह पश्चिम महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे.