उत्तरेत थंडीसह विषारी धुरक्याचे संकट, राजस्थानात तापमान 10 अंशांच्या खाली; भोपाळही गारठले

देशातील उत्तरेकडील भागात थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानसह दहा राज्यांत सलग दुसऱया दिवशी धुक्याचा धुरळा उडाला आहे. धुक्यामुळे दृश्यमान कमी झाले. बर्फवृष्टीमुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून तापमान 10 अंशांच्या खाली आहे. मध्य प्रदेशातील पचमढी येथे 5.6 अंश तापमानाची नोंद झाली. भोपाळमध्ये तापमान 9.8 अंश आहे. जबलपूरमध्ये ते 10 अंश आहे, जे जम्मू आणि डेहराडूनपेक्षा कमी आहे. राजस्थानच्या चुरू, माऊंट अबू, फतेहपूर, सिरोही येथे तापमान 10 अंशांपेक्षा कमी नोंदवले गेले. हिमाचल प्रदेशात तीन दिवसांपूर्वी बर्फवृष्टी झाली.

दिल्लीत दाट धुके

दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात दाट धुके पडले आहे. या धुक्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडत आहेत. दिल्लीत कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी लोकांनी शेकोटी पेटवणे सुरू केले आहे. दिल्लीतील तापमान 12 अंशांपर्यंत खाली आले. दिल्लीत दाट धुके पसरल्याने अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झाली आहे. दिल्लीत प्रदूषण आणि धुके असा दुहेरी मारा दिल्लीवासीयांना सहन करावा लागत आहे.

फेंगलचा प्रभाव

तामीळनाडूमध्ये मंगळवारी आणि बुधवारी असा दोन दिवस पावसाने हजेरी लावली. चेन्नई आणि आसपासच्या जिह्यांमध्ये 29 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या दबावामुळे हा पाऊस होत आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे. फेंगलचा प्रभाव पाहून तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एनडीआरएफच्या सात टीम 4 जिह्यांमध्ये तैनात केल्या आहेत.