दादरमध्ये आजपासून गटारी महोत्सव, नॉनव्हेज प्रेमींसाठी मस्त ‘मेजवानी’!

तिसऱ्याचे वडे, पाया मसाला, कलेजी पेटा, झणझणीत चिकन खर्डा, पापलेट पुरचुंडी अशा जिभेचे चोचले पुरवणाऱया एकापेक्षा एक नॉनव्हेज पदार्थांची भरपेट मेजवानी करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते दादर पश्चिमेला गोखले रोडवरील ‘हॉटेल नव मेजवानी’ येथे 25 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘गटारी महोत्सवा’चे. सी फूड, चिकन, मटण, तंदूर अशा श्रेणीतील 50 हून अधिक पदार्थ येथे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नॉनव्हेज प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच गटारी अमावास्येला नॉनव्हेजवर यथेच्छ ताव मारला जातो. यानंतर श्रावण मास सुरू होत असल्यामुळे बहुतांश कुटुंबांमध्ये गणपती विसर्जनापर्यंत मांसाहार केला जात नाही. त्यामुळे मित्र आणि कुटुंबीय यांच्यासोबत गटारी कुठे साजरी करायची? सगळ्यात टेस्टी नॉनव्हेज पदार्थ कुठे मिळतात? याबद्दलचे खवय्यांचे प्लॅनिंग आतापासूनच सुरू झाले आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हॉटेल नव मेजवानीतर्फे गटारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी या महोत्सवाला 700 ते 800 खवय्यांनी भेट दिली होती.

चिंबोरीचे कालवण, फिश टिक्का अन् बरंच काही!

गटारी महोत्सवात चिकन, मटण आणि फिश थाळीसह वेगवेगळ्या प्रकारचे तंदूर स्टार्टर यांच्याशिवाय चिंबोरीचे कालवण, मटण चॉप्स, गावठी चिकन, चिकन वडे, चिकन भुजिंग, खिमा मसाला, तांबडा आणि पांढरा रस्सा तसेच सोलकढी असे अनेक पदार्थ उपलब्ध असणार आहेत. 25 जुलै ते 4 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7 ते रात्री 11.30 दरम्यान महोत्सव सुरू राहील. ज्यांना महोत्सवात प्रत्यक्ष भेट देणे शक्य नाही ते स्विगी किंवा झोमॅटो या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून किंवा 8779766676 या क्रमांकावर पह्न करून घरबसल्या ऑर्डर करू शकतात. पार्टीसाठीदेखील ऑर्डर स्वीकारल्या जातील.