अंतिम सामन्यातही रिकाम्या खुर्च्या

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना सोडला तर टी-20 वर्ल्ड कपचा एकही सामना हाऊसफुल्ल नव्हता. निम्म्यापेक्षा अधिक लढतीत अर्धे स्टेडियम रिकामेच होते. आता हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना रंगतोय आणि त्या सामन्याच्याही किमान पाच हजारांपेक्षा अधिक तिकिटे शिल्लक आहेत. म्हणजेच हिंदुस्थानच्या कोटय़वधी चाहत्यांसाठी वेस्ट इंडीजच्या वेळेनुसार सकाळी केन्झिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱया अंतिम सामन्यासाठीही अंतिम सामन्यातही हजारोंच्या संख्येने खुर्च्या रिकाम्या राहणार आहेत.

यंदाचे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन हिंदुस्थानी क्रिकेट आणि हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसाठीच केले होते असे अनेक क्रिकेटपटूंनी आयसीसीवर आरोप केले आहेत. या स्पर्धेचे सामने हिंदुस्थानी प्रेक्षकांना पाहाता यावेत म्हणून हिंदुस्थानच्या रात्रीच्या वेळेनुसार म्हणजे सकाळी आयोजित केले गेले होते. हिंदुस्थानच्या सामन्यांना हिंदुस्थानी चाहते होते, पण स्थानिक क्रिकेटप्रेमींच्या अनुपस्थितीमुळे स्टेडियम रिकामेच असायचे. हा प्रकार हिंदुस्थानसह अनेक सामन्यांमध्ये पाहायला मिळाला. आता अंतिम सामना विंडीजच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे हा अंतिम सामना हाऊसफुल्ल करण्याचे आयसीसी आणि विंडीज बोर्डापुढे खूप मोठे आव्हान असेल.